जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर
>माझे विचार माझे लेखन
या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG

विद्यार्थी चे लेखन निर्मिती ब्लॉग * FOLLOW MY BLOG

Friday, January 30, 2026

अनुभव आणि जीवन...

एक विशाल जहाजाचं इंजिन बिघडलं. खूप प्रयत्न करूनही कोणत्याही इंजिनिअरला ते दुरुस्त करता आलं नाही. मग कोणीतरी अशा एका मेकॅनिकल इंजिनिअरचं नाव सुचवलं ज्याला या प्रकारचं काम करण्याचा 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता.

त्याला बोलावण्यात आलं. इंजिनिअर आला, त्याने इंजिन अगदी वरपासून खालपर्यंत काळजीपूर्वक तपासलं. सगळं पाहिल्यानंतर त्याने आपली बॅग खाली ठेवली आणि त्यातून एक छोटासा हातोडा काढला. त्याने इंजिनच्या एका ठराविक ठिकाणी हलकं टकटक केलं आणि म्हणाला.. "आता इंजिन सुरू करून बघा."

सगळे आश्चर्यचकित झाले कारण इंजिन लगेच सुरू झालं! इंजिन दुरुस्त करून इंजिनिअर निघून गेला. जहाजाच्या मालकाने इंजिनिअरला विचारलं.. "फी किती?"

इंजिनिअर म्हणाला.. "20,000/- रुपये."

"काय?!" मालक आश्चर्याने म्हणाला. "तुम्ही जवळजवळ काहीच केलं नाही. माझ्या माणसांनी सांगितलं की तुम्ही फक्त हातोड्याने हलकं टकटक केलं. एवढ्या छोट्या कामासाठी इतकी फी? आम्हाला एक सविस्तर बिल द्या."

इंजिनिअरने बिल दिलं. त्यात लिहिलं होतं:

हातोड्याने टकटक केलं: 2/- रु.
कोठे आणि किती टकटक करायचं हे माहित असणं: 19,998/- रु.

मग इंजिनिअर शांतपणे म्हणाला.. "जर मी एखादं काम 30 मिनिटांत केलं, तर त्यामागे मी 30 वर्षं घालवली आहेत हे शिकण्यासाठी की ते काम 30 मिनिटांत कसं करायचं. मी तुम्हाला 30 मिनिटं दिली नाहीत, मी तुम्हाला माझा 30 वर्षांचा अनुभव दिला आहे. फी ही वेळेसाठी नाही तर माझ्या अनुभवासाठी आहे."

हे ऐकून जहाजाचा मालक लाजला आणि आनंदाने इंजिनिअरला त्याची फी दिली.

म्हणूनच – कुणाच्याही कौशल्याची आणि अनुभवाची कदर करा... कारण तो त्यांच्या वर्षानुवर्षांच्या संघर्ष, प्रयोग, मेहनत आणि अश्रूंचा परिणाम असतो. 🌸

"किंमत वेळेची नसते… किंमत असते अनुभवाची ✨
कारण तो अनुभव मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे घाम, कष्ट आणि संघर्ष गेला असतो."

Thursday, January 29, 2026

संस्काराचे महत्व...

संस्कार म्हणजे माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर उमटणारे चांगल्या विचारांचे व योग्य वर्तनाचे ठसे. आई-वडील, शिक्षक, समाज आणि अनुभव यांच्या माध्यमातून माणसामध्ये संस्कार घडत जातात. हे संस्कारच माणसाला चांगले–वाईट, योग्य–अयोग्य यातील फरक समजायला शिकवतात.
संस्कारांमुळे माणसात प्रामाणिकपणा, नम्रता, शिस्त, परोपकार, आदरभाव आणि संयम हे गुण निर्माण होतात. केवळ शिक्षण असून उपयोग नाही, जर त्यासोबत चांगले संस्कार नसतील तर माणूस दिशाहीन होतो. संस्कार हे जीवनाचे खरे दागिने आहेत.
लहानपणी मिळालेले संस्कार आयुष्यभर मार्गदर्शन करतात. संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद संस्कार देतात. समाजात शांतता, एकोपा व सहकार्य टिकवण्यासाठी संस्कारांची मोठी गरज असते. संस्कारयुक्त व्यक्ती समाजाचा आदर्श बनते.
आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ यश महत्त्वाचे नाही, तर ते प्रामाणिकपणे व नीतीने मिळवणे महत्त्वाचे आहे. हेच संस्कार आपल्याला शिकवतात. म्हणूनच म्हटले जाते –
“संस्कार हीच खरी संपत्ती आहे.”

Thursday, January 22, 2026

कमजोरी म्हणजे हार नव्हे..

 


मानवजीवनात प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कमजोरी असते. कमजोरी म्हणजे अपूर्णता, मर्यादा किंवा एखाद्या गोष्टीत कमी पडणे; पण ती हार नसते. खरे तर कमजोरी ओळखणे हेच यशाच्या दिशेने पहिले पाऊल असते. जो माणूस आपली कमजोरी स्वीकारतो, तोच तिला सुधारण्याचा प्रयत्न करतो.

अपयश किंवा कमजोरी आल्यावर खचून जाणे सोपे असते; पण धैर्याने उभे राहून प्रयत्न करत राहणे हेच खरे शौर्य आहे. अनेक महान व्यक्तींनी सुरुवातीला अपयश, गरिबी, आजार किंवा शिक्षणातील अडथळे अनुभवले; तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या कमजोरीतूनच बळ निर्माण केले आणि पुढे यश संपादन केले.

कमजोरी आपल्याला नम्र बनवते, शिकवते आणि अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देते. चुका झाल्या तर त्यातून धडा घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. सातत्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन असला की कमजोरी हळूहळू ताकदीत बदलते.

म्हणूनच, कमजोरी म्हणजे शेवट नाही; ती नव्या सुरुवातीची संधी असते. हार तेव्हाच मानली जाते, जेव्हा आपण प्रयत्न थांबवतो. प्रयत्न सुरू असतील, तर कमजोरी कधीच हार ठरत नाही.

Monday, December 22, 2025

देशाचा खरा पोशिंदा


23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने माझा हा निबंध..

शेतकरी हा आपल्या देशाचा खरा पोशिंदा आहे. तो शेतात राबून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो. ऊन, पाऊस, थंडी किंवा वादळ असो, शेतकरी कोणतीही तक्रार न करता मेहनत करतो. आपल्या कष्टातून तो गहू, भात, ज्वारी, भाजीपाला व फळे पिकवतो. आपण रोज जे अन्न खातो, ते शेतकऱ्याच्या घामाचे फळ असते.
शेती हे आपल्या देशाचे मुख्य व्यवसाय आहे. अनेक लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी पाऊस कमी पडतो, तर कधी जास्त पडतो. तरीसुद्धा तो हार न मानता पुन्हा कामाला लागतो.
म्हणूनच शेतकऱ्याचा आपण आदर केला पाहिजे. त्याच्या कष्टांची जाणीव ठेवून अन्नाचा अपव्यय टाळला पाहिजे. शेतकरी आनंदी असेल, तर देशही समृद्ध होईल.
म्हणून म्हणता येईल..

मातीशी नातं जोडलेला, घामाने शेत पिकवणारा,
अन्न देतो जगाला साऱ्या, तोच खरा पोशिंदा हमारा.
कष्ट त्याचे अमूल्य असती, मान द्यावा त्याच्या कामाला,
शेतकरी आहे जीवनदाता, नमन त्याच्या परिश्रमाला.

शेतकऱ्याला सलाम माझा  ..

  नितेश येवले 
इयत्ता सहावी 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर



Friday, December 19, 2025

शिकला तोच टिकला

शिकला तोच टिकला..

मानवी  जीवनात शिक्षणाचे आणि कौशल्याचे महत्त्व  फार मोठे आहे.माणूस जेव्हा काही शिकतो, तेव्हा ते ज्ञान, अनुभव किंवा कौशल्य त्याच्या आयुष्यभर त्याच्यासोबत राहते. संपत्ती, सत्ता किंवा वैभव कधीही नष्ट होऊ शकते; पण शिकलेले ज्ञान कधीही हिरावून घेतले जाऊ शकत नाही.

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ औपचारिक शिक्षण पुरेसे नाही. काळानुसार नवीन गोष्टी शिकणे, तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि बदलांना सामोरे जाणे आवश्यक आहे. जो माणूस सतत शिकत राहतो, तोच समाजात टिकतो. शिक्षणामुळे माणसाला विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते.

ग्रामीण भागातील शेतकरी आधुनिक शेतीपद्धती शिकतो तेव्हा त्याचे उत्पन्न वाढते. कारागीर नवे तंत्र शिकतो तेव्हा त्याचा व्यवसाय टिकतो. शिक्षक, डॉक्टर, अभियंता किंवा कामगार—सर्वांसाठी शिकणे हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शिक्षणामुळे व्यक्ती स्वावलंबी बनते, स्वतःचा विकास करते आणि समाजाच्या विकासात योगदान देते.

“शिकला तो टिकला” या म्हणीचा खरा अर्थ असा की जीवनात टिकायचे असेल, प्रगती करायची असेल आणि आत्मसन्मानाने जगायचे असेल तर शिकणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच आपल्याला आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे. शिकण्याची तयारी आणि जिज्ञासा असणारा माणूस कधीही अपयशी ठरत नाही—तो नेहमीच टिकून राहतो.

म्हणूनच म्हणतात शिकेल तो टिकेल..धन्यवाद 

अबोली राम गवळी..

इयत्ता 7 वी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर 


Sunday, December 7, 2025

फास्ट फूड.. आणि आरोग्य.


फास्ट फूड..
हल्ली धावत्या युगामध्ये लाईफस्टाईल बदलली आहे 
यामध्ये खाण्याच्या पद्धती सुद्धा खूप बदलले आहेत 
हल्लीच्या धावत्या जगामध्ये फास्ट फूड खाण्यावर जास्त भर दिला आहे. त्याचेच वाईट परिणाम आपल्याला दिसत आहेत.
फास्ट फूड म्हणजे असे खाद्यपदार्थ जे लवकरात लवकर तयार केले जातात आणि त्वरित ग्राहकांना दिले जातात. आजच्या धावपळीच्या जीवनात, वेळेची बचत होत असल्याने फास्ट फूडची मागणी खूप वाढली आहे. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, आणि फ्रेंच फ्राईज ही याची काही लोकप्रिय उदाहरणे आहेत. फास्ट फूड स्वस्त असते आणि सहज उपलब्ध होते, त्यामुळे अनेक लोक याला प्राधान्य देतात. मात्र, सुविधा पुरवत असले तरी याचे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.
या पदार्थांमध्ये मीठ, साखर, आणि हानिकारक चरबीचे प्रमाण खूप जास्त असते, तर पोषक तत्त्वे आणि फायबरची कमतरता असते. फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा (Obesity), मधुमेह (Diabetes) आणि हृदयविकार यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच, पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे पर्यावरणालाही धोका निर्माण होतो.
म्हणूनच, फास्ट फूडचे सेवन फक्त कधीतरी आणि मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे. आपण आपल्या आहारात पौष्टिक आणि घरगुती जेवणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. आहारामध्ये आपण भाजी भाकरी , मोड आलेली कडधान्य फळे यांचा समावेश केला पाहिजे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. उत्तम आरोग्य असेल तरच जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. 
फास्ट फूड पासून लांब राहू 
मानवी जीवनात चांगले आरोग्य पाहू..
धन्यवाद 

रेणुका मल्लाप्पा नाईकवडी 
इयत्ता सहावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर 



Friday, December 5, 2025

क्रांतिसिंह नाना पाटील


           *क्रांतिसिंह नाना पाटील*
      (क्रांतिकारक व समाजसुधारक)
           *जन्म : ३ ऑगस्ट १९००*
(येडे मच्छिंद्र, वाळवा तालुका सांगली)
           *मृत्यू : ६ डिसेंबर, १९७६ (वय ७६)*                           
                 (वाळवा)
चळवळ :  भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ
                                 

 क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते.                                                                                             नाना पाटील यांच्या वरती प्रारंभीच्या काळात सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. पुढील काळात ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. साताऱ्यातील प्रतिसरकारच्या स्थापनेत त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. नाना पाटील यांनी साताऱ्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना करून महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. भूमिगत चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचे अस्तित्व नाममात्र राहिले. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीच्या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये नाना पाटलांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. या काळामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली या परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर एक मोठी दहशद निर्माण झाली होती. प्रतिसरकार अथवा 'पत्री सरकार' म्हणून या काळात ते ओळखले गेले. मंत्र प्राप्तीनंतर हे नाना पाटील यांनी सातारा सांगली परिसरामध्ये आपले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवले कारमध्ये त्यांना मोठी लोकप्रियता देखील मिळाली.ते महत्त्वाचे क्रांतिकारक होते.

 *जीवन*                
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. 

💥 *स्वातंत्र्य लढा*   १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.

या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.                        १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.

यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.                

  *स्वातंत्र्योत्तर काळ*                            

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

 *संबंधित साहित्य*                                                     क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादक: रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
               
      

अनुभव आणि जीवन...

एक विशाल जहाजाचं इंजिन बिघडलं. खूप प्रयत्न करूनही कोणत्याही इंजिनिअरला ते दुरुस्त करता आलं नाही. मग कोणीतरी अशा एका मेकॅनिकल इंजिनिअरचं नाव ...